मुंबई : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल, मास्टरमाईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. बीड घटनेप्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशतच निर्माण झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महायुतीमध्ये गोंधळाची अवस्था
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की महायुती सरकारमध्ये बिलकुल आलबेल नाही. निवडणुकीच्यापूर्वी देखील प्रचंड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामे केली गेलेली आहेत. अनेक कामांचे इस्टीमेट वाढवण्यात आले आहे. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी बाहेर येतच आहेत. आताही सरकारमध्ये गोंधळाची अवस्था आहे. ते पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी महायुती सरकारवर केली आहे.