मुंबई : प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची आधीच नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक चालवावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच ड्रग्ज प्रकरणात कोणाही पोलिसाचा जर थेट संबंध आढळला तर तो कोणत्याही हुद्यावर असो त्याला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र पोलिस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल पद्धतीने तपास केला आहे. नवीन कायदयाचा अवलंब करून वेळेत तसेच संपूर्ण पुराव्यासह आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण फास्टट्रॅक चालविण्याची विनंती न्यायालयाला करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ड्रग्जशी संबंधित पोलिस बडतर्फ होणार
महाराष्ट्र पोलिस परिषद पार पडली आहे. त्यात विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे तीन नवीन कायदे देशात तयार झाले आहेत त्याची महाराष्ट्रात कशा प्रकारे अंमलबजावणी होणार याचे सादरीकरण झाले. महासायबर प्लॅटफॉर्म तयार झाला आहे त्याचेही सादरीकरण झाले. महिला बाल अत्याचार रोखण्यासाठी तसेच या संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व वेळेत आरोपपत्र दाखल कसे होईल याची चर्चा झाली. तसेच उदयोगांना कोणताही त्रास होउ नये यावरही चर्चा झाली. त्याचसोबत फॉरेन्सिक कॅपेबिलीटी वाढविता कशी येईल याचे सादरीकरण झाले.
अंमलीपदार्थबाबत काय कारवाई करता येईल यावर चर्चा झाली. ड्रग्जबाबत आपण झीरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबिली आहे. पोलिस मग तो कोणत्याही रँकचा असो ड्रग्ज प्रकरणाशी जर त्याचा थेट संबंध आढळला तर त्याला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गुन्हयात जो मुददेमाल जप्त करण्यात येतो तो संबंधित मालकाला तातडीने परत करण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.