मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची तर मुख्य प्रतोदपदी अमित विलासराव देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधिमंडळ पक्षाची जबाबदारी तरूण नेत्यांवर सोपवत काँग्रेसने कार्यकर्त्यांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. महायुतीने भरघोस यश मिळवत विधानसभा काबीज केली. विधानसभेत महायुती बहुमताने सत्तारूढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस तसेच महाविकास आघाडीसमोर मोठी आव्हाने आहेत. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी काँग्रेसला नव्या दमाची फौज हवी होती. पक्षाने नुकतीच प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. तर विधिमंडळ नेतेपदी विजय वडेटटीवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आता काँग्रेसच्या विधिमंडळ पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची, सचिव पदी डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
अमित विलासराव देशमुख, विश्वजीत कदम, सतेज पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी देखील चर्चेत होती. आता विधिमंडळातील जबाबदारी देऊन पक्षाने समतोल साधला आहे. ही तरूण आणि नव्या दमाची फौज विधिमंडळात पक्षाचे अस्तित्व कशा प्रकारे दाखविणार हे येत्या अधिवेशनात दिसून येणार आहे.