27.6 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रझाकण्यापेक्षा आरोपींचे चेहरे समाजाला दाखवणे गरजेचे

झाकण्यापेक्षा आरोपींचे चेहरे समाजाला दाखवणे गरजेचे

मुंबई : प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, छेडछाड प्रकरणातील टवाळखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी रक्षा खडसे यांनी केली आहे. या प्रकरणी रूपाली चाकणकर म्हणाल्या, मी स्वत: स्थानिक पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिका-यांशी संपर्क केला आहे. टवाळखोरांवर याआधीही गुन्हे दाखल आहेत, आता ही कारवाई होत आहे. गरजेच्या ठिकाणी अशा घटना घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही, बीट मार्शल असे असताना सुद्धा अशा घटना घडत आहेत. जो कोणी असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल.

जे कृत्य केले आहे ते लाजिरवाणे आहे. माणसांच्या कळपातील ही विकृती आहे यांचा चेहरा झाकण्यापेक्षा ते चेहरे समाजाला दाखवणे गरजेचे आहे. किती निर्लज्ज लोक आहेत हे माणसांना समजू दे. गृह विभाग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्य महिला आयोग असेल, त्या भागातील पोलिस देखील याबाबत निश्चितपणे तत्परता दाखवतील आणि अशांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

स्वारगेट प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परता दाखवली आहे. अशा घटनांमध्ये मीडिया ट्रायल न करता खाकी वर्दीवर कोणत्याही प्रकारचे डाग न लावता ते जे कारवाई करतील त्याला मदत करावी. स्वारगेट प्रकरणामध्ये न्यायदेवता योग्य निर्णय देईल, अजून वेळ आहे. आताच कोणताही निष्कर्ष काढायला नको, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR