27.6 C
Latur
Monday, March 3, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात जंगलराज

राज्यात जंगलराज

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे चिन्ह आहे. राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली असून महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

दरम्यान, स्वारगेट एसटी डेपोमध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर पहाटेच्या वेळी बलात्कार झाला. हे प्रकरण ताज्े असतानाच, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली. त्या टवाळांना अटक व्हावी म्हणून खुद्द रक्षा खडसेंना पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागला. राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला-मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले, गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला-मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. सुरक्षारक्षक सोबत असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. त्यानंतर टवाळखोरांना अटक करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागतो यावरून राज्यात पोलिसांचे नाही तर गुंडांचे राज्य आले आहे हेच दिसून येते.

महायुती सरकारने मोठ्या हट्टाने निवृत्त झालेल्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिली. पण शुक्ला आणि गृहमंत्री फडणवीस यांचा पोलिस प्रशासनावर वचक आणि पकड राहिलेली नाही, त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. राज्याला सक्षम पोलिस महासंचालक आणि पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार नियंत्रणात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा आणि फडणवीसांनी राजीनामा देऊन राज्याला सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी रोखठोकपणे मांडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR