अ गटात तिन्ही सामन्यांत विजय, आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार
दुबई : वृत्तसंस्था
फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे भारताने अ गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला. गट टप्प्यात भारताची अपराजित मालिका सुरूच राहिली. कारण संघाने तिन्ही सामने जिंकून गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता ४ मार्च रोजी दुबई येथे होणा-या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप बीमध्ये दुस-या स्थानावर आहे. आता न्यूझीलंडला दुस-या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या डावाची भन्नाट सुरुवात झाली. पण १५ धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीदेखील ११ धावांवर बाद झाला आणि भारताची ३ बाद ३० अशी अवस्था झाली. पण श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी ९७ धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचली आणि संघाला सावरले. पण अक्षर ४१ धावांवर बाद झाला. पण श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले.
श्रेयस शतकाच्या दिशेने कूच करत असताना विल यंगने अप्रतिम झेल पकडत त्याला बाद केले. त्याने ९८ चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकांत जलदगतीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. त्याने ४५ धावा केल्या. त्यामुळे भारताला २४९ धावा करता आल्या. भारताच्या २५० धावांचा पाठलाग करणा-या न्यूझीलंडला भारताने ठराविक फरकाने धक्के दिले. पण यावेळी भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर होता तो केन विल्यम्सन याचा. त्याने अर्धशतक झळकावत संघाचे आव्हान जीवंत ठेवले. पण अक्षर पटेलने अखेर केनला बाद केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. त्यामुळे ४४ धावांनी भारताने शानदार विजय मिळविला.