कोंडगाव : कोंडगाव येथील अंगणवाडीमध्ये अजब प्रकार पाहायला मिळाला. स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषक खाद्यात उंदीर सापडला. यामुळे सर्व स्तरातून संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे स्तनदा आणि गरोदर मातांना पोषक खाद्य देण्यात येते.
मातांना आणि होणा-या किंवा झालेल्या बाळांना पोषण तत्व मिळावे हा यामागचा हेतू असतो. दरम्यान यासंदर्भातील गंभीर प्रकार समोर आलाय. स्तनदा आणि गरोदर मातांना देण्यात येणा-या पोषक खाद्यच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
यावेळी कोंडगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियांका जोयशी यांनी कोंडगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडीमध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी आणि जबाबदार एजन्सीवर कार्यवाही करावी असे सांगितले. तसेच याविषयीं माहिती देताना सांगितले की, हा आमच्या गावातील नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला प्रकार अतिशय गंभीर असून यापढे हे खपवून घेतलं जाणार नाही.
दर महिन्याला हे पोषक खाद्य एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यामाध्यमातून या धान्याचे वितरण अंगणवाडी मधून केले जाते.साधारण सरासरी महिन्याला २०-२५ महिलांना हे खाद्य दिले जाते. हे निकृष्ट खाद्य खाल्ले तर याची लागण लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना घडू शकते, याला कोण जबादार? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.त्यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवर शासन स्थरावरून कोणती कार्यवाही होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.