अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांच्या उपस्थितीत दमदाटी केल्यामुळे सारे जग सिमित झाले आहे. शुक्रवारी रात्री चर्चेदरम्यान जोरदार वादावादी झाली. त्यानंतर झेलेन्स्की यांनी युक्रेन-अमेरिका दरम्यानच्या प्रस्तावित खनिज करारांवर स्वाक्षरी न करताच व्हाईट हाऊस सोडले. दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय चर्चेवेळी अशा प्रकारे कॅमे-यांसमोर शाब्दिक चकमक होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले तेव्हा स्वत: ट्रम्प यांनी प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले होते.
ज्या उद्देशाने झेलेन्स्की अमेरिकेत आले होते तो सफल झाला नाहीच. उलट आता रशिया विरुद्धच्या युद्धात अमेरिका युक्रेनला पुरवत असलेली मदत सरसकट थांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे युक्रेन युद्धात संभाव्य शस्त्रविराम तसेच सद्यस्थितीत युके्रनचे संरक्षण करण्याची जबाबदारी झेलेन्स्की आणि त्यांचे युरोपियन सहकारी यांच्यावर येऊन पडली आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेस सुरुवात झाली तेव्हा प्रारंभी ट्रम्प यांनी युक्रेन युद्धविरामाच्या प्रयत्नांना लवकर यश येईल, असे सांगितले. झेलेन्स्की यांनीही काही प्रश्नांना उत्तरे दिली; पण युद्धविराम आणि पुतीन या मुद्यांवर असलेले तीव्र मतभेद समोर येतील, अशी शक्यता दिसत होती. हे मतभेद उकरून काढण्याचे काम उपाध्यक्ष व्हान्स यांनी केले. कोणत्या मुत्सद्देगिरीविषयी आपण बोलत आहात? असा सवाल झेलेन्स्की यांनी व्हान्स यांना केला तेव्हा तुमचा पवित्रा अनादरजनक असल्याचा आरोप व्हान्स यांनी केला.
झेलेन्स्की स्वत:चा आणि युके्रनचा बचाव करू लागले. आमच्यासारखी वेळ कधीतरी तुमच्यावरही येऊ शकते, असे ते म्हणाले. त्यावर शांत बसलेले ट्रम्पही भडकले. तुम्ही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहात हे विसरू नका. आम्ही नसतो तर दोन आठवड्यात तुम्ही संपला असता, असे सांगत ट्रम्प आणि व्हान्स यांनी दमदाटी केली. युक्रेनमधील खनिज समृद्ध प्रदेशात उत्खननाचा परवाना अमेरिकेला देणे आणि यातील ५० टक्के खनिजाच्या बदल्यात अमेरिकेकडून सुरक्षा हमी मिळवणे हा झेलेन्स्की यांच्या भेटीचा मूळ उद्देश होता. अमेरिकेकडून शस्त्रास्रे मिळवत असताना युद्धविरामाच्या दिशेने ठोस पावले उचलणे हे विषयदेखील भेटीच्या कार्यक्रम पत्रिकेवर होते. ट्रम्प हे सातत्याने पुतिन यांची बाजू घेताना युक्रेनलाच युद्धाबद्दल जबाबदार धरू लागले होते. त्याबद्दल ट्रम्प यांची थेट भेट घेऊन त्यांचे शंकानिरसन करण्याचा झेलेन्स्की यांचा हेतू होता.
या भेटीची दृष्ये पाहिल्यानंतर एक शक्यता मनात येते ती म्हणजे झेलेन्स्की यांना दमदाटी करणे आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडणे हे डावपेच पूर्वनियोजित असावेत. या प्रकरणी उपाध्यक्ष व्हान्स यांनी पुढाकार घेतला. कारण त्यांनीच पहिल्यांदा झेलेन्स्की यांना चिथावणी दिली आणि त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सापळ्यात झेलेन्स्की सापडले, असे अनेक विश्लेषकांचे मत आहे. झेलेन्स्की यांची मुत्सद्देगिरी कमी पडली, असेही म्हटले जात आहे. युद्धविरामासाठी ट्रम्प मोठी भूमिका बजावतील, अशी अपेक्षा ठेऊन गेलेल्या झेलेन्स्की यांना प्रत्यक्षात जाहीर दमदाटीला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी चर्चा अर्धवट सोडली आणि अमेरिकी जनतेचे आभार मानून तेथील उर्वरित कार्यक्रम रद्द करून निघून जाणे पसंत केले. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील शाब्दिक चकमकीची जगभर चर्चा सुरू आहे. केवळ झेलेन्स्की यांच्या संदर्भात असे घडले असे नाही. गत सुमारे ४० दिवसांत ट्रम्प यांचे ५ देशांच्या प्रमुखांशी खटके उडाले आहेत.
ट्रम्प यांनी दुस-यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पहिली भेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी झाली होती. ट्रम्प यांच्या मनात काय आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत. ट्रम्प यांना जगभरात आपली ओळख सुपरमॅन अशी बनवायची आहे. सध्या अमेरिकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा मानस आहे. अमेरिकेला अधिक बळकट करायचे आहे. त्यासाठी सत्तेवर येताच त्यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा नारा दिला होता. त्यांना आपल्या लोकांसमोर स्वत:ची प्रतिमा (इमेज) बनवायची आहे. ट्रम्प सध्या रोज नवे आणि बेधडक निर्णय घेत आहेत. त्यांचा एक निर्णय अमेरिकन लोकांनाही धक्कादायक ठरला. शुक्रवारी रात्री त्यांनी अमेरिकेच्या सर्वाेच्च लष्करी अधिका-याला तडकाफडकी हटवले त्यामुळे लष्कर आणि अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. युक्रेनवर रशियाने थेट हल्ला करून युद्धाला सुरुवात केली. त्या वेळी लोकशाही मानणा-या देशाला वाचवण्यासाठी अमेरिका युक्रेनला सर्व प्रकारची मदत करत होता. ती मदत आता वसूल करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. युक्रेनच्या खनिज संपत्तीवर त्यांचा डोळा आहे.
आता युरोपीय देशांना युक्रेनच्या पाठीशी राहावे लागणार हे खरे असले तरी युरोप आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. अमेरिकेने युके्रनला आर्थिक व लष्करी मदत केली नसती तर हे युद्ध केव्हाच संपले असते. आता तोच पवित्रा ट्रम्प आर्थिक कारणांसाठी घेत आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हा रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला मदत केली होती. आता ट्रम्प यांचा प्राधान्यक्रम वेगळा आहे त्यामुळे ते युक्रेनवर दबावतंत्राचा वापर करत आहेत. अमेरिका युक्रेनला मदत करणे थांबवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासाठी चर्चेचा मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही; परंतु आता चर्चा म्हणजे आपल्याला हवे तेच करवून घेणे ही ट्रम्पनिती आहे. युद्धोत्तर सुरक्षा हमी अमेरिकेकडून मिळेल का? याबाबत हट्टी, दूराग्रही ट्रम्प काहीच स्पष्टपणे बोलत नाहीत.