बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळीच मस्साजोग गावाला भेट देऊन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील यांना दारात पाहताच धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी हंबरडा फोडला. लहान मुलाप्रमाणे ते जरांगे यांच्या गळ्यात पडून रडले. या हृदयद्रावक दृश्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
जरांगे यांनी धनंजय देशमुख यांचे सांत्वन केले, मात्र त्यांनाही अश्रू आवरणे कठीण झाले. यावेळी मस्साजोग गावचे काही ग्रामस्थही उपस्थित होते, आणि तेदेखील या घटनेने सुन्न झाले होते. धनंजय देशमुख यांच्या दु:खात संपूर्ण गाव सहभागी झाल्याचे चित्र दिसत होते.
चार्जशीटमधून समोर आलेले भयानक राक्षसी कृत्य आणि मारहाणीच्या घटनेतील फोटो पाहून संतोष देशमुख यांचे बंध्ू धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले, तर या ८ आरोपींना पाठबळ मिळाल्यानेच त्यांची इथपर्यंत मजल केल्याचेही धनंजय यांनी म्हटले.