24.8 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeसंपादकीयसुसाट रस्ते, सुसाट बळी!

सुसाट रस्ते, सुसाट बळी!

लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटीजवळ सोमवारी (३ मार्च) झालेल्या बस अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले. त्यातील ६ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजकावरून पलिकडच्या लेनवर उलटली आणि ७० फूट फरफटत गेली. राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून चाकूर तालुक्यातील आष्टा मोड आणि नांदगाव पाटी हे स्पॉट अपघाताचे डेंजर झोन म्हणून ओळखले जात आहेत. अहमदपूर आगाराची अहमदपूर-लातूर ही बस लातूरकडे निघाली होती. नांदगावपाटीजवळील रस्ता दुभाजकाजवळ बस आली तेव्हा एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडताना दिसला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचालकाने बस दुभाजकातून उजव्या बाजूच्या रस्त्यावर नेली.

त्यावेळी दुभाजकावर एक चाक गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झाली नसली तरी अनेकांच्या डोक्याला, छातीला मार लागला असून एकाचा हात निखळला आहे तर दोघांच्या हाताची बोटे तुटली आहेत. देशात चांगले गुळगुळीत रस्ते होत आहेत. देशात महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्याचे स्वागत केलेच पाहिजे. या रस्त्यांच्या निमित्ताने त्या-त्या गावांचा विकास होत असतो आणि विकासाच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होतो. परंतु रोजगाराची निर्मिती होत असताना दुसरीकडे वाढत जाणा-या रस्ते अपघातांची संख्या बघितली तर या अपघातांमुळे किती प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होत आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. गत दहा वर्षांत सुमारे दोन कोटी लोकांचा बळी गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसांचा केवळ रस्ते अपघातात बळी जात असेल तर ती अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल.

जगात आतापर्यंत अनेक मोठी युद्धे झाली, त्यात लाखो लोकांचे बळी गेले परंतु कोणत्याही प्रकारचे युद्ध न करता भारतात दरवर्षी दीड लाख आणि दशकभरात दीड-दोन कोटी लोकांचे जीव अपघातांमध्ये जात असतील तर त्यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे मोठमोठ्या रस्त्यांची निर्मिती होते आहे. दररोज ३० किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा विक्रम होतो आहे पण त्याबरोबरच दररोज जर तीन हजार लोकांचे बळी जात असतील तर या रस्ते बांधणीचा वेग आणि मनुष्यबळी जाण्याचा वेग हा सारखाच किंवा समप्रमाणात आहे असे म्हणावे लागेल. रस्त्यांची जर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत असेल तर मनुष्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही कमी झाले पाहिजे कारण अनेक सुविधा देणारे सुखदायी रस्ते तयार झाले आहेत. अपघातांचे प्रमाण कमी झाले पाहिजे परंतु दुर्दैवाने तसे चित्र पहावयास मिळत नाही. उलट अपघातांची संख्या वाढत आहे.

रस्ते आधुनिक होण्याचे प्रमाण वाढत असताना त्यातला सर्वांत मोठा विरोधाभास असा की, रस्ते वाढत आहेत आणि अपघातही वाढत आहेत! खराब रस्त्यांमुळे अपघात होणे किंवा अपघातांचे प्रमाण वाढणे साहजिक आहे परंतु सुंदर रस्ते तयार होऊनही अपघात वाढत असतील तर त्याला काय म्हणावे? अर्थात याला मनुष्य स्वभावही कारणीभूत आहे. वाहनचालकांचे बेदरकार वाहन चालवणे, रहदारीचे नियम न पाळणे, वेगावर नियंत्रण न ठेवणे, बेशिस्त पादचारी आदी कारणे अपघातांचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. अन्य देशांचा आदर्श समोर ठेवूनच आपल्या देशातही रस्तेबांधणी करण्यात आली आहे. अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते आधुनिक करण्याचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे सर्व प्रकारची आधुनिकता येऊनही रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होत नसेल तर या रस्त्यांच्या निर्मितीचा किंवा वेगाचा नेमका कोणता उद्देश साध्य होतो आहे यावर गंभीरपणे विचार करावा लागेल. कारण रस्तेनिर्मिती करताना केवळ दळणवळणाचा वेग वाढणे एवढाच मर्यादित उद्देश ठेवून चालणार नाही.

सुंदर सुखदायी रस्ते तयार झाल्याने कमी वेळेत मोठा पल्ला गाठता येतो, वाहनकोंडी कमी होते, त्यातून पेट्रोल, डिझेल वाचते, इंधन बचत होते. रस्त्यांची निर्मिती आणि पर्यायाने रोजगारनिर्मिती होत असताना रस्ते अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसतील तर मग विकासाचा आणि मनुष्यहानी टाळण्याच्या प्रयत्नांचा कोणताच ताळमेळ बसत नाही हे लक्षात घ्यावे लागेल. पायाभूत सुविधांच्या नावाखाली सरकार दरवर्षी सुमारे १२ लाख कोटी रुपये रस्ते विकासावर खर्च करते. रस्ते विकास करताना रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यालाही तितकेच प्राधान्य द्यायला हवे. अनेक ठिकाणी चौपदरी, सहा पदरी, आठ पदरी रस्ते तयार झालेले दिसतात. या रस्त्यांवर ५० ते १५० कि.मी. अंतरावर एकही रुग्णालय, प्राथमिक उपचार केंद्र, अ‍ॅम्ब्युलन्स नसेल तर रस्ते विकासाचा मूळ उद्देश काय असा प्रश्न निर्माण होतो.

केवळ वाहने सुसाट धावण्यासाठी या रस्त्यांची निर्मिती आहे का? रस्ते चांगले झाल्यामुळे वाहने सुसाट धावतात, कमी वेळेत इच्छित स्थळ गाठतात हे खरे आहे. परंतु सुसाट जीवही जात आहेत ते कसे रोखणार? भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात रस्ते अपघातात सर्वाधिक बळी जात आहेत. भारतातल्या लोकसंख्येचा एक चांगली मनुष्यशक्ती म्हणून प्रधानसेवक कौतुक करत असतात. ही मनुष्यशक्ती म्हणजे एक मोठे भांडवल आहे असेही ते म्हणतात. परंतु ही मनुष्यशक्ती वाचवण्यासाठी ते कोणते प्रयत्न करत आहेत ते मात्र सांगत नाहीत! रस्ते अपघात कमी होत नसल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी संसदेत माफी मागितली होती. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते.

रस्ते अपघातातील जखमींवर कॅशलेस उपचार योजनेची घोषणाही त्यांनी केली होती. रस्ते अपघातात जखमींना मदत करणा-यांना २५ हजार रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले होते. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकारी वाहनचालकांवर कडक कारवाई करतात परंतु अपघातांना कारणीभूत ठरणारी रस्त्यावरील परिस्थिती मात्र सर्वांकडून दुर्लक्षित राहते. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होतात तर काही अपघात हे दुस-याच्या चुकीमुळे घडतात. नांदगाव पाटीजवळ झालेला बस अपघात हा दुचाकीस्वाराच्या चुकीच्या यूटर्नमुळे झाल्याचे दिसून येते. म्हणजे त्या दुचाकीस्वाराची चूक बसमधील ४० जणांना भोगावी लागली. म्हणजेच वाहन चालवताना किती सतर्क राहायला हवे याची कल्पना या अपघाताच्या व्हीडीओवरून लक्षात येऊ शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR