सोलापूर-कामकाजात अनियमितता, मनमानी व गैरकारभारप्रकरणी सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक मंडळ बरखास्त का करू नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटिसीवर सुनावणी पूर्ण झाली असून याप्रकरणी पुण्याचे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील हे आता कायनिर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे. एकूणच दूध संघाच्या संचालक मंडळावर बरखास्तीच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला अनेक वर्षांपासून आर्थिक तोटा होत आहे. संचालक मंडळाचा निष्क्रिय कारभारच याला जबाबदार आहे. प्रचंड मोठा तोटा होत असतानाही संचालक मंडळाने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभासदांच्या हिताचा कारभार होत नाही, यासह इतर विविध ११ मुद्द्यांवर विभागीय दुय्यम उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. याची दखल घेऊन चौकशी करण्यात आली.
या चौकशीत दूध संघाचे संचालक मंडळ दोषी असल्याचे आढळून आले. त्यामुळे संचालकांना बरखास्त करून प्रशासक का नियुक्त करू नये?, अशी नोटीस दुग्ध उपनिबंधक पाटील यांनी सर्व संचालकांना बजावली होती.
या नोटीसवर आतापर्यंत चार सुनावण्या झाल्या आहेत. पहिल्या दोन सुनावण्यांमध्ये संचालकांनी कागदपत्रांची मागणी केली होती. कागदपत्र मिळाल्यानंतर संचालकांनी त्यांचे म्हणणे सादर केले होते. संचालकांच्या लेखी म्हणण्यावर दुग्धचे उपनिबंधक पाटील यांच्यासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर सुनावणी पूर्ण झाली आहे. आता जिल्हा दूध संघावर प्रशासक की संचालक मंडळच कायम राहणार याचा फैसला होणार आहे.यात जिल्हा दूध संघातर्फे अॅड. माधव सोमण, संचालकांच्यावतीने अॅड. जन्मेजय कुर्जेकर यांनी काम पाहिले.