मुंबई : वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचे गुणगान केले. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांचे संपूर्ण अधिवेशनापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांना चार खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, अबू आझमी यांनी औरंगजेब संदर्भातील जाणूनबुजून केले. त्यांच्या वोट बँकेतील रॅडिकल एलिमेंटला ते संदेश देऊ इच्छितात. त्यामुळे ते मुद्दाम बोलत असतात. औरंगजेबाने मंदिरे लुटली, हिंदुंवर कर लावले, महिलांचा छळ केला. संभाजी महाराजांना छळ करून मारले. हे सर्वांना माहीत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.
औरंगजेब हिरो होऊ शकत नाही!
औरंगजेब कधीच कोणाचा हिरो होऊ शकत नाही. आपली एक परंपरा आहे. रामाला देव मानतो. श्रीकृष्णाला देव मानतो. राम आणि कृष्णाची नावे आपल्या मुलांना ठेवतो. पण औरंगजेब नावाचा एखादा व्यक्ती दाखवा. कोणी औरंगजेब हे नाव ठेवत नाही. औरंगजेब हा मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही.