30.1 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार अबू आझमी निलंबित

आमदार अबू आझमी निलंबित

औरंगजेबाची प्रशंसा महागात, अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई

-अधिक शिक्षेसाठी सत्ताधारी आक्रमक, विधानसभेत गोंधळ

मुंबई : प्रतिनिधी
औरंगजेबाची स्तुती करणा-या समाजवादी पार्टीचे आमदार अबू असिम आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा ठराव आज विधानसभेत घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधान भवन आवारात येण्याचीदेखील बंदी घालण्यात आली. अबू आझमी यांना यापेक्षा अधिक काळासाठी निलंबित करावे, यासाठी सत्ताधारी सदस्य प्रचंड आक्रमक झाले. यामुळे विधानसभेत काही काळ जोरदार गदारोळ झाला. अबू आझमी यांच्यावरील कारवाईला आमचा पाठिंबाच आहे; पण त्यांच्या बरोबरच छत्रपती शिवरायांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरही कारवाई करावी यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली.

अबू आझमी यांनी विधान भवन आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. आझमींच्या या वक्तव्यावरून एकच गदारोळ झाला. सत्ताधारी आमदार आझमींविरोधात आक्रमक झाले. मंगळवारी विधानसभेचे कामकाज या मुद्यावरून स्थगित करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली होती. बुधवारी उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, हे आझमींचे वक्तव्य अतिशय गंभीर आहे. त्यांचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे, तसेच त्यांना या कालावधीत विधान भवन आवारात प्रवेशबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भाजपाचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या वेळी जुने दाखले देत केवळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन न करता त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी केली. हवे तर यासाठी आमदारांची समिती नेमा. तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित करा, असे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी औरंगजेबाचे समर्थन कोणी करू शकत नाही. मुस्लिम लोकांमध्येही कोणी मुलांचे नाव औरंगजेब ठेवत नाहीत, असे स्पष्ट केले.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आझमींच्या निलंबनाचा प्रस्ताव मतास टाकला. बहुमताने हा प्रस्ताव संमत झाल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या वेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. त्यांनी अध्यक्षांसमोरील जागेत येऊन आझमींच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या तर अबू आझमी यांच्यावरील कारवाईला आमचा पाठिंबाच आहे; पण त्यांच्या बरोबरच छत्रपती शिवरायांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी, यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली.

कोरटकर, सोलापूरकरच्या
अटकेसाठी विरोधक आक्रमक
प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवराय यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून अवमान केला. यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत लावून धरली. त्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तिकडे विधान परिषदेतही याच मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अबू आझमी यांच्यावरील कारवाई झालीच पाहिजे; पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे प्रशांत कोरटकर व अभिनेता राहुल सोलापूरकर यांनाही अटक करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे विधान परिषदेत गदारोळ झाला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर तर चिल्लर आहे. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिले, त्याचा निषेध करणार आहात का? असा सवाल केला. त्यामुळे गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR