करीमनगर : वृत्तसंस्था
काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षाला जबर धक्का बसला आहे. राज्यात विधान परिषदेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसने केवळ एका जागेवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना ती जागा जिंकता आली नाही. राज्यातील तिसरा प्रमुख पक्ष असलेल्या बीआरएसने ही निवडणूक लढवली नव्हती.
२०२३ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाची सत्ता उलथवून तेलंगाणामध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यानंतर राज्यात भाजपानेही आपला जोरदार विस्तार करण्यात यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने तेलंगाणातमध्ये आठ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता विधान परिषदेच्या दोन जागांवर मिळालेल्या विजयाने भाजपाचा आत्मविश्वास वाढणार आहे. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारसमोर भाजपाच्या रूपात एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
तेलंगाणामधील मेदक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच वारंगल-खम्मम-नलगोंडा शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि एक पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. यापैकी करीमनगर पदवीधर मतदारसंघात भाजपाने पाठिंबा दिलेल्या चौधरी अंजी रेड्डी यांनी काँग्रेसच्या नरेंद्र रेड्डी यांचा ५ हजार मतांनी पराभव केला. तर भाजपा समर्थित मलका कोमारैया यांनी करीमनगर शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला. तर अपक्ष उमेदवार श्रीपाल रेड्डी पिंगिली यांनी वारंगल-खम्मम-नलगौंडा शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला.
तेलंगाणामध्ये मिळालेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसे भाजपाला दिलेल्या पाठिंब्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.