हिंगोली : प्रतिनिधी
लोककला ही सर्व विकसित कलांची जननी आहे. तिचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भ. मा. परसावळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हिंगोली येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित लोकसंगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप बलखंडे, हिंगोली जिल्ह्याचे सहाय्यक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, प्रा. डॉ. किशोर इंगोले, लोककला अभ्यासक भगवान राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चित्रकार भ. मा. परसावळे पुढे म्हणाले की, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला या सर्वांची पाळेमुळे आदिवासी संस्कृतीतून आलेली आहे. ते त्यांच्या संस्कृतीचा आणि जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत. नृत्य, नाट्य, लोक संगीत हे त्यांच्या अंतर्मनातून प्रकट झालेला अविष्कार आहे. पूर्वीच्या काळी तळागाळातील लोकसंगीतासाठी कुठलाही राजाश्रय नव्हता परंतु अलीकडच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या सर्व कलांची आणि कलावंतांची दखल घेतली जाते. लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. आणि वर्षभर वेगवेगळे महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ही समाधानाची बाब आहे असे ते म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या लोकसंगीत महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सहाय्यक संचालक संदीप बलखंडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. संदीप बलखंडे यांनी प्रास्ताविक केले. गणपत माखणे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन पाईकराव यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर गायिका संज्योती जगदाळे, गायक कुणाल वराळे, शाहिरा मीरा उमप व श्रावणी महाजन आणि सहका-यांचा लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास हिंगोलीच्या रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.