प्रयागराज : प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. ४५ दिवस चाललेल्या महाकुंभात देश-विदेशातून ६६ कोटींहून अधिक लोक सहभागी झाले होते. यासाठी संपूर्ण प्रयागराजमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासोबतच अनेक एजन्सीही सुरक्षा व्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवून होत्या. दरम्यान, आता हा महाकुंभाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यूपी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तो महाकुंभात दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचे उघड झाले आहे.
उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कौशांबीमध्ये छापा टाकला आणि दहशतवादी लाजर मसीहला अटक केली. त्याच्याकडून तीन हातबॉम्ब, दोन डिटोनेटर, एक पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे आणि दोन जिलेटिन रॉड जप्त करण्यात आले आहेत. लाजरस मसिहचा गेल्या डिसेंबरमध्ये पिलीभीतमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याशीही संबंध असल्याचेही तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, त्याच्याकडून जप्त केलेली शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पाकिस्तानात बसलेल्या आयएसआयच्या हँडलरने ड्रोनद्वारे पाठवले होते. बब्बर खालसा या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा लाजर मसीह धर्मांतरित ख्रिश्चन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो पाकिस्तानात बसलेल्या तीन आयएसआय एजंट्सच्या थेट संपर्कात होता. लाजर देशातून पळून जाण्याच्या मार्गावर होता. यासाठी तो गाझियाबादमधून बनवलेल्या बनावट आधारकार्डच्या आधारे बनावट पासपोर्ट बनवण्याचाही प्रयत्न केला.
ड्रग्स तस्करी प्रकरणात अमृतसर तुरुंगात असलेल्या लाजर मसीहचे तुरुंगातच इतर कैद्यासोबत भांडण झाले, मारामारीत जखमी झाल्यावर त्याला उपचारासाठी गुरू नानाक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २४ सप्टेंबर २०२४ रोजी तो रुग्णालयातून फरार झाला आणि २३ ऑक्टोबर रोजी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मन मॉड्यूलचे प्रमुख स्वरण सिंग याच्या सांगण्यावरुन पंजाबमधील बटाला येथे एका व्यक्तीची हत्या केली. पंजाबच्या मुक्तसर तुरुंगात बंद असलेल्या एका गुन्हेगाराच्या माध्यमातून लाजर आयएसआय एजंटच्या संपर्कात आला होता.
या आयएसआय एजंटच्या मदतीने तो पाकिस्तानच्या पंजाब सीमेवरून ड्रोनद्वारे विदेशी शस्त्रे, हँडग्रेनेड आणि हिरॉईन आयात करत असे. पोलिसांचे म्हणणे आहे की, याआधी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदनेही चौकशीदरम्यान आयएसआयच्या माध्यमातून पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे विदेशी शस्त्रे आणि दारूगोळा पाठवल्याची कबुली दिली होती. पंजाबमधील पोलीस चौक्यांवर झालेल्या हँडग्रेनेड हल्ल्यात लाजर आणि त्याच्या साथीदारांकडून हँडग्रेनेडचा पुरवठा करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.
लाजर मसीह अमेरिकेत राहणा-या खलिस्तानी दहशतवाद्यांच्याही संपर्कात आहे. त्याचा पोर्तुगालमध्ये बसलेला मित्र सिग्नल अॅपद्वारे संपूर्ण माहिती देत होता. त्याचा आणखी एक साथीदार कतारमध्ये बसला असून, तो पोर्तुगालमध्ये बसलेल्या दहशतवाद्याच्या संपर्कात आहे. डीजीपींच्या म्हणण्यानुसार, लाजर महाकुंभमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता, परंतु पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे योजना फसली.