24.9 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मराठीच

महाराष्ट्रात मराठीच

जोशींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : प्रतिनिधी
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून सर्वत्र गदारोळ उठल्यानंतर आणि विरोधकांनी सरकारला लक्ष्य केल्यानंतर सरकारच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देताना, महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठीच आहे, महाराष्ट्रात येणा-यांनी मराठी शिकलंच पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे.

राजधानी मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वाद पेटला आहे. शिवसेनेसह विरोधकांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून तीव्र संताप व्यक्त करत सरकारला लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका मांडताना भैय्याजी जोशी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भैय्याजी जोशी यांनी तामिळनाडू आणि गुजरातमध्ये जाऊन असे वक्तव्य करून दाखवावे, असे आव्हानदेखील या नेत्यांनी दिले. तसेच, सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. विधानसभेत या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत येणा-याने मराठी भाषा शिकली पाहिजे असे नाही, असे वक्तव्य भैय्याजी यांनी केले होते.

मी भैय्याजी जोशींचे वक्तव्य ऐकले नाही, त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन. पण, आमची, सरकारची भूमिका काय आहे तर, मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैय्याजींचे देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
भाषावार प्रांतरचना झाली, आता गल्लीवार प्रांतरचना करत आहेत का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणा-या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचे म्हटले. मग, आता भैय्याजी जोशी चिल्लर माणूस आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून दाखवावे नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणा-यावर कारवाई करून दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, अशा शब्दांत ठाकरे कडाडल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR