परभणी : परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरवंड शिवारात मुख्य रस्त्यालगत दि. ५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राजराजेश्वर जिनींगसमोर व्यापा-याच्या तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न करून मारहाण करीत १४ लाख ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत जिनींग मालक रामनिवास शर्मा (रा.रंगनाथ नगर, नांदखेडा रोड, परभणी) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी रात्री ८ च्या सुमारास ते आपल्या कारमधून परभणीकडे निघाले होते. त्यावेळेस त्यांच्या कारसमोर दुसरी कार उभी करण्यात आल्याने त्यांनी वाहन थांबवून काच खाली घेताच समोरच्या वाहनातून पांढ-या रंगाचे टीशर्ट परिधान केलेले अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाचे दोन तरूण जवळ आले.
त्यातील एकाने तोंडावर स्प्रे मारण्याचा प्रयत्न केला मात्र आपण चुकवला. त्यानंतर गाडीतील १४ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग घेण्याचा प्रयत्न करू लागले. परंतू विरोध केल्याने धक्काबुक्की करण्यात आली. आपण ती बॅग दोन्ही पायांमध्ये घट्ट पकडून ठेवली. त्यानंतर दोघांनी गाडीबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि १४ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग घेऊन ते दोघे कारने गंगाखेडच्या दिशेने पसार झाल्याचे शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रात्री १०च्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, दैठणा सपोनि अशोक जायभाये यांनी भेट देवून माहिती घेतली. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक जायभाये हे करीत आहेत.