23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रभय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ

कोणी काहीही म्हणो, मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही आदित्य ठाकरे-नितेश राणेंमध्ये विधानसभेत जोरदार खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत राहणा-याला मराठी भाषा आलीच पाहिजे असे काही नाही. या रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेत विरोधकांनी आज विधिमंडळात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे तुकडे करण्याचे काम हा संघाचा छुपा अंजेडा आहे, मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जायची आहे, असा आरोप करत विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पविर्त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. तर विधानसभेत विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. राज्यातील प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे ठणकावून सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या शेरेबाजीमुळे आदित्य ठाकरे आणि मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये जोरदार वाद झाल्याने वातावरण स्फोटक झाले होते. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केल्यानंतर वातावरण निवळले.

मुंबईच्या विद्याविहार येथील एका कार्यक्रमात संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी, मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणा-या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या मुद्यावरून फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. विधानसभेत ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी हा विषय उपस्थित केला. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र रा.स्व.संघाच्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे संबोधन करताना घाटकोपरमध्ये गुजराती समाजाची संख्या जास्त आहे.

त्यामुळे येथे गुजराती भाषा बोलली गेली तरी हरकत नाही असे विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, भय्याजी जोशी नेमके काय म्हणाले हे मी ऐकलेले नाही. मात्र सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना, मुंबई-महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहणार. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, बोलता आली पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्याचवेळी आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो. ज्याचे आपल्या भाषेवर प्रेम असते तो इतरांच्या भाषेवरही प्रेम करतो असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आदित्य ठाकरे-नितेश राणे आमने सामने
फडणवीस यांनी केलेल्या स्पष्टीकरणावर भास्कर जाधव यांचे समाधान झाले होते. पण त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे हे बोलायला उभे राहिले. मंत्री नितेश राणे आणि इतर भाजपा सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. मुख्यमंर्त्यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याने त्यावर आता अधिक बोलता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून खडाजंगी सुरू झाली. नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात चांगलीच चकमक उडाली. तेव्हा ठाकरेंच्या बचावार्थ वरूण सरदेसाईंसह इतर आमदार पुढे आले. तर नितेश राणे,आशिष शेलार,योगेश सागर हे देखील आक्रमक झाले होते. दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून जोरदार गदारोळ सुरू झाला. अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांकरिता तहकूब केले.

विधानपरिषदेतही गदारोल
याच मुद्यावरून विधानपरिषदेतही जोरदार गदारोळ झाला. मुंबईचे तुकडे करण्याचा संघाचा छुपा अजेंडा आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन गौरवले. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मराठी भाषेला कायमच दुय्यम दर्जाची वागणूक दिली गेली आहे. मराठी भाषेला डावलून संघाला तुकडे करायचे आहेत. मुंबईचे तुकडे करण्याचे काम हा संघाचा छुपा अंजेडा आहे, मुंबई तोडून ती गुजरातमध्ये घेऊन जायची आहे, असा हल्ला शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केला. मराठीचा अपमान करणा-या जोशींवर सरकारने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाज रोखून धरले. या गदारोळामुळे सभापतींनी दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले. मुंबईतील उद्योग तर गुजरातला पळवले आहेतच.

आता मुंबईचे तुकडे पाडून त्यांची भाषा गुजराती करण्याचा कट रचला जात आहे,असा आरोप करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. शिवरायांबद्दल बोलणा-यांवर कारवाई केली त्याप्रमाणे जोशींवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केली. विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर जोशी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. पण महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. त्याबाबत शासनाची कुठलीही भूमिका वेगळी नाही, असे स्पष्ट केले. विरोधकांनी सरकारच्या निषेधार्थघोषणा देत सभात्याग केला.

भैय्याजी जोशींकडून स्पष्टीकरण
माझ्या कालच्या बोलण्यामुळे काही गैरसमज होत आहेत. मी विविध भाषांच्या सह अस्तित्वावर बोलत होतो त्यामुळे मी स्वत: स्पष्ट करू इच्छितो की, मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे व प्रत्येकाला मराठी भाषा शिकली पाहिजे असे स्पष्टीकरण भैयाजी जोशी यांनी कालच्या वक्तव्यावर उमटलेल्या पडसादानंतर केले आहे.

राजद्रोहाचा खटला भरा : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर टीका करताना, त्यांनी तामिळनाडू आणि गुजरातमध्ये जाऊन असं व्यक्तव्य करुन दाखवावे, असे आव्हान दिले. सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. पूर्वी भाषावार प्रांतरचना झाली, आता गल्लीवार प्रांत रचना करत आहात का? शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर चिल्लर माणूस आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आता भैय्याची जोशी सुद्धा चिल्लर माणूस आहे असे जाहीर करा किंवा त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR