ढोकी : ढोकी येथे आढळलेल्या बर्ड फ्लू(एच५एन१) संसर्गामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ढोकी पोलिस स्टेशन ते सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे. ६ मार्च रोजी प्रशासनाने कारवाई केली असून एकूण ५०७ कोंबड्यांचे कलिंग (नि:संशय नष्टिकरण), १३० अंडी व १३० किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहेत. तर संपूर्ण परिसरातील चिकन दुकाने तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.
ग्रामपंचायतीचा सतर्कतेचा इशारा
ग्रामपंचायतने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सध्या मांसाहार टाळावा, असे आवाहन केले आहे. तसेच, संसर्ग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत पोल्ट्री उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सूचनांचे पालन करा
ढोकी व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सहकार्य करावे, जेणेकरून बर्ड फ्लूचा प्रसार रोखता येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले आहे.