सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरअपघातांचे सत्र सुरूच असून, ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.
यवतमाळ जिल्ह्यातील आसेगाव देवी येथील भाविक शिर्डी दर्शनासाठी निघाले असताना त्यांचा क्रूझर (एमएच-२५आर-३५७९) वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने ते सुरक्षा कठड्याला धडकून पलटी झाले. या अपघातानंतर मागून येणा-या दुस-या एका कारचे (एमएच-२९-सीबी-९६३०) नियंत्रण सुटल्याने ती देखील क्रूझरवर आदळली. या अपघातात विद्याबाई साबळे (५५) आणि मोतीराम बोरकर (६०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच भावना रमेश राऊत (३०), प्रतिभा अरुण वाघोडे (४५) आणि मीराबाई गोटफोडे (६५) हे गंभीर जखमी झाले. महामार्ग अॅम्बुलन्सच्या डॉ. यासीन शहा, वैभव बोराडे आणि चालक दिगंबर शिंदे यांच्या पथकाने जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात हलविले.
इतर प्रवासी किरकोळ जखमी
क्रूझरमधील संतोष साखरकर, कमलाबाई जाधव, सुशीला जाणार, मिराबाई राऊत, छायाबाई चव्हाण, प्रमिला घाटोले, भक्ती राऊत, रमेश राऊत, बेबीबाई येलोत यांना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, क्रेटा कारमधील प्रवासी सुदैवाने बचावले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पीएसआय गजानन उज्जैनकर, हेड कॉन्स्टेबल मुकेश जाधव आणि सिंदखेडराजा पोलिस ठाण्याचे अधिकारी संदीप डोंगरे, विष्णू नागरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्यूआरव्ही टीमचे पवन काळे, खंडू चव्हाण, अभिषेक कांडेकर आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मच्छिंद्र राठोड, अविनाश राठोड, अजय पाटील यांनी मृत आणि जखमींना बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.