बीड :: ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेत आमदारांकडून लक्षवेधी मांडले जात आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडत पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे सांगितले. तसेच यामुळे पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात आल्याची गंभीर बाब त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली. त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रसायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडणा-या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
कोणत्याही उद्योगाला प्रक्रिया न करता थेट रासायनमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्याची मुभा दिली जाणार नाही. अशा उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच कोणत्याही विशिष्ट प्रकरणाची तक्रार आल्यास तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे देखील पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर बोलताना स्पष्ट केले.
नद्यांमधील वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय भूमिका बजावणार तसेच दोषी उद्योगांवर कारवाई कधी केली जाणार असा जाब आमदार शंकर जगताप यांनी विचारला. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अशा कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे.