26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसीरियात सुरक्षा दलांवर असद समर्थकांचे हल्ले; १८० ठार

सीरियात सुरक्षा दलांवर असद समर्थकांचे हल्ले; १८० ठार

 

सीरियात माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद समर्थक आणि विद्यमान हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा (अबू मोहम्मद अल-जुलानी) सरकारचे सैन्य यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. असद यांच्या अलावी समाजाचे लढाऊ आणि सरकारी फौजांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत १८० हून अधिक जण ठार झाले आहेत.

असद यांच्या निष्ठावंतांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. यामुळे हिंसाचार उसळला, असे सरकारचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सुरक्षा दलांवर रहिवासी भागात बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बशर अल असद यांना सत्तेवरून हटवल्यानंतर झालेल्या उठावानंतर सीरियातील हा सर्वात भीषण हिंसक संघर्ष आहे.

सौदी अरेबिया, तुर्कस्तान, रशिया, इराण आणि संयुक्त राष्ट्रांनी सीरियातील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ुमन राइट्सने या हिंसाचारात १८० जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हिंसाचारग्रस्त भाग हा अल्वी समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी राष्ट्राध्यक्ष असदही याच समाजातून येतात.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अल-जुलानी यांच्या नेतृत्वाने असद यांना सत्तेतून हटवले होते. ते सध्या रशियात आश्रय घेत आहेत. सीरियातील हिंसाचारामुळे दमास्कसवरील आपले नियंत्रण बळकट करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. सरकार सातत्याने आपले नियंत्रण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे, पण लताकियामध्ये त्याला अडचणी येत आहेत. लताकिया प्रांत हा असद यांचा बालेकिल्ला असून येथे अलावी लोकसंख्या मोठी आहे. सुरक्षा दल आणि असद समर्थकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR