बीड : प्रतिनिधी
ऑक्टोबर २०२३ मध्ये परळी येथील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासात १६ महिन्यांनंतरही फारशी प्रगती न झाल्याने आता हा तपासदेखील गुन्हे अन्वेषम विभागाकडे जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास दोन वेळा बदलला असून, आता अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले तपास करीत आहेत. त्यांच्या मदतीला तपासासाठी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांचे पथक आहे. आता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले जाणार आहे.
परळी येथील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांचे २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अपहरण झाले. दि. २२ ऑक्टोबर रोजी परळी पोलिस ठाण्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावर जखमा होत्या. त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेला सव्वा वर्ष लोटत आहे. दरम्यान, मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सुरुवातीला परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सानप यांनी केला. या काळात तपासात कुठलीही प्रगती नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे खून प्रकरणाला वाचा फुटली. आमदार सुरेश धस यांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर त्यांच्या पत्नीनेही तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर तपासाला वेग आला.
सध्या उपविभागीय पोलिस अधिका-यांमार्फत तपास
पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या गुन्ह्याचा तपास अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे सोपविला. त्यांच्या मदतीला पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह इतर चौघांचे पथक नेमण्यात आले.
अनेकांचे जबाब नोंदवले
चौकशी पथकाने परळीत अनेकांचा जबाब नोंदविले. संशयितांच्या चौकशाही केल्या जात आहेत. मात्र, अद्याप आरोपींविरुद्ध ठोस पुरावे हाती लागलेलेले नाहीत. अजूनही काही संशयित पथकाच्या रडारवर आहेत. ठोस पुरावे न मिळाल्याने अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.