नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये बुधवारी फोनवर चर्चा झाली. इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी ही चर्चा केली आणि युद्ध थांबवण्याच्या आवश्यकतेवर दोघांनीही सहमती दर्शविली. यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांमधील संभाषणात, ब्लिंकन यांनी संघर्षाची व्याप्ती रोखण्यासाठी सर्व पक्षांनी काम करण्याची’ गरज पुन्हा सांगितली.
वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात “गोळीबार थांबवणे आणि शक्य तितक्या लवकर युद्ध संपवणे हे पहिले प्राधान्य असल्याचे सांगितले. वांग यी म्हणाले की, चीन हे संघर्ष थांबवण्यासाठी सर्व पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे.
दोन राज्यांच्या तोडग्यावरही त्यांनी भर दिला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन बुधवारी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) अधिकृत दौऱ्यावर आहेत. हा दौराही महत्त्वाचा मानला जात आहे कारण युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी मोजक्याच देशांना भेट दिली आहे. पुतीन यांचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा रशियाने मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात मध्यस्थाची भूमिका बजावण्याचा आपला इरादा दर्शवला आहे. पुतिन आपल्या भेटीदरम्यान व्यवसाय आणि गुंतवणूक तसेच इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर चर्चा करतील. पुतीन यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर सुरू असलेले युद्ध हे अमेरिकन मुत्सद्देगिरीचे अपयश असल्याचेही म्हटले आहे.