बार्शी : मयत मुलावर करणी केल्याच्या कारणावरून विहिण बाईचा निघृण खून केल्याप्रकरणी बाप-लेकीसह तिघांना बार्शी येथील जिल्हा न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी जन्मठेप व प्रत्येकी ६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कीर्तीमाला आगतराव काळे(२५), आगतराव लक्ष्मण काळे (७३, दोघे रा. अकोले बुद्रुक, ता. माढा) आणि आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेकर (वय २५, रा. मांजरी ता. जि. लातूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. लक्ष्मी गोकुळ पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
माढा तालुक्यातील मौजे अकोले (बु) येथील आरोपी आगतराव काळे याचा मुलगा अपघातात मयत झाला होता. मयत मुलाची बायको कोमलला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार हिची कोमलची ननंद कीर्तीमाला, प्रीती उर्फ गुड्डी, सासू विमल या भेटू देत नव्हत्या. ३० जानेवारी – २०२१ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास लक्ष्मी हीस मुलगी कोमल हिची भेट घालून देते म्हणून कीर्तीमाला, प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून ५००० रुपये घेतले.
किर्तीमाला हिचा मयत भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिने करणी केल्याचा राग मनात धरून कीर्तीमाला, प्रीती उर्फ गुड्डी, प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय उर्फ आकाश अशोक भालेराव, आगतराव काळे, विमल काळे या सर्वांनी कट रचून मयत लक्ष्मी हिचा कोयता, सुरा, लोखंडी कुन्हाड या हत्यारांनी वार केले. आरोपींनी लक्ष्मीचे सू-याने नरडे कापले, हाताचे कोप-यावर, पायाचे घोट्याजवळ, नडगीवर पिंडरीवर, मांडीवर वार केले व सर्वांनी मिळून तिचा खून करून साडीस दगडे बांधून तिचे प्रेत विहिरीतील पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला.
त्यामुळे याबाबत मयताची बहीण हिच्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलिस ठाण्यात वरील आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक अशोक बाबर यांनी करुन आरोपीविरुद्ध पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. याची सुनावणी बार्शी येथील जिल्हा न्यायाधीश मांडे यांच्यासमोर झाली.
याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने १४ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार करण भोसले, पोलिस शिपाई तुकाराम माने-देशमुख, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिलेला कीर्तीमालाने दाखवणे, त्याच्या आधारे साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता तरीही परिस्थितीत जन्य पुराव्याच्या आधारे संपूर्ण गुन्ह्याची एकेक कडी ही सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडून युक्तीवाद केला. तो ग्रा धरून जिल्हा न्यायाधीश मांडे यांनी कीर्तीमाला काळे, आगतराव काळे, आकाश भालेकर यांना दोषी जन्मठेप व प्रत्येकी ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
याप्रकरणात सरकार पक्षा अॅड. दिनेश देशमुख यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.