कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वी भाजपने मतदारांची फसवणूक केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने दिल्याचा आरोप त्यांनी केला. कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, केंद्रीय एजन्सी ‘भाजपला खुराक देण्यासाठी’ वारंवार पश्चिम बंगालचा दौरा करत आहेत.
ममता बॅनर्जी यांनी भाजपला देशातील सर्वात मोठे खिसेकापू असे संबोधले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये ट्रान्सफर करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानंतर त्यांनी नोटाबंदी लागू केली आणि नंतर महामारीमुळे निवडणुकीच्या काळात मोफत रेशन देणे अचानक बंद केले. निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देऊन लोकांना फसवतात, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. आम्ही (तृणमूल काँग्रेस) त्यांच्यासारखे नाही, असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितले.
उत्तर प्रदेशचे उदाहरण देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मोठ्या प्रमाणात बनावट जॉब कार्ड आढळून आल्यानंतरही उत्तर प्रदेशाला निधी दिला जात आहे. मात्र केंद्र सरकार १०० दिवस काम योजनेचे पैसे पश्चिम बंगालला देत नाही. पश्चिम बंगालच्या थकबाकीसाठी ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना भेटावे या गिरीराज सिंह यांच्या सूचनेवर मुख्यमंत्री म्हणाल्या की, त्यांनी यापूर्वी तीन वेळा पंतप्रधानांची भेट घेतली आहे आणि पुन्हा एकदा त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे.