मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेश होत आहे. या नव्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरु आहे. हे विमानतळ कधीपासून सुरु होणार याविषयी देखील बरीच चर्चा रंगली होती. आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी माहिती देण्यात आली.
नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २.६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. त्यामुळे तेथून एप्रिल, २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिग सुरु होणार
शिर्डी विमानतळाच्या १ हजार ३६७ कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. सन २०२१ मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
अमरावती बेलोरा विमानतळ ३१ मार्चपासून सुरू
अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून ३१ मार्च २०२५ पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरी विमानतळाच्या कामाला वेग
रत्नागिरी विमानतळाची १४७ कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत. तर गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु आहेत.
अकोला विमानतळासाठी निधी उपलब्ध करणार
अर्थ संकल्प २०२५ मध्ये अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.