31.6 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeसोलापूरनऊ आगारांमध्ये नेमणार महिला सुरक्षा रक्षक

नऊ आगारांमध्ये नेमणार महिला सुरक्षा रक्षक

पुण्याच्या दुर्दैवी घटनेनंतर एसटी महामंडळाला आली जाग

सोलापूर : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात घडलेल्या घटनेनंतर एसटी महामंडळ खडबडून जागे झाले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल एसटी महामंडळात आता महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने विविध कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. लवकरच ही प्रक्रिया संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नादुरुस्त एसटी बसेस इतरत्र हलवल्या जाणार असून समाजकंटकांचा उपद्रव थांबवण्यासाठी पोलिसांची गस्त पथक वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान, स्वारगेट मध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासंबंधी मध्यवर्ती कार्यालयाकडून आता हालचाली सुरू झाल्या आहेत. एसटीचे ऑडिट करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. एसटीमध्ये होणारे अनैतिक प्रकार तत्काळ थांबवण्यासाठी बंद पडलेल्या गाड्या हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोलापूर आगारातील बंद पडलेल्या एसटी बसेस तात्काळ चिंचोली एमआयडीसी येथे हलवण्यात येणार आहेत. त्यासाठीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे

. एसटी महामंडळाच्या चिंचोली एमआयडीसी येथील जागेत या बसेस स्क्रैप करण्यात येणार आहेत. त्याच पद्धतीने स्क्रैप गाड्यांची लवकरच विल्हेवाट करून परिसर स्वच्छ ठेवण्यात येणार आहे. अडगळीत थांबणाऱ्या बस गाड्यांचा समाजकंटकांकडून वापर होऊ नये म्हणून महामंडळाने ठोस पावले उचललेली आहेत.

सोलापूरसह जिल्ह्यातील नऊ आगारांच्या आवारात नादुरुस्त असलेल्या बसेस तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. महसूल आणि आरटीओ विभागाने कारवाई करून महामंडळाच्या जागेत लावलेल्या खाजगी बसेसची विल्हेवाट लावण्याचे पत्र विभागीय व्यवस्थापकांकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्या पत्राला आरटीओ कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर मध्यवर्ती एसटी स्थानकात पोलीस चौकी असूनही त्यामध्ये पोलीस कर्मचारी नसल्याचा फायदा उपद्रवी समाजकंटकांना होतो.पुण्यातील स्वारगेट घटनेनंतर पोलीस प्रशासनावरही टीका झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन देखील डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त बस स्थानक आवारात वाढला. स्थानक आणि यांत्रिक विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर महामंडळाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक वाढवली आहे.

सोलापूर सहराज्यभरातील एसटी बस स्थानकांच्या आवारात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तीन पाळी मध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहेत. यासाठी खासगी सुरक्षा रक्षकांकडून निविदा मागवली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, अकलूज, करमाळा व कुर्डवाडी या नऊ आगारांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश प्राप्त होताच, हे कर्मचारी कर्तव्यावर हजर होतील असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR