मानवत : येथील मलिकार्जुन मंदिर समोरील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील उड्डान पुलावरून परभणीकडे भरधाव वेगात जाणा-या कारने मंगळवार, दि.११ रोजी सकाळी ६.४५च्या मॉर्निंग वॉकला जात असताना बालासाहेब झुटे यांना कारने उडवले. कार इतकी वेगात होती की विद्युत मंडळाच्या खांबाला धडक दिल्याने विद्युत तारा तुटल्या. तसेच झुटे हे उंच उडून बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याने जागीच मृत्यू झाला.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ वरून कार क्र. एम.एच.१४ बी.आर. ८६९० परभणीकडे जात होती. याच वेळी राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या गोलाईत नगर परिसरातील बाळासाहेब झुटे (वय ५४) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना उड्डान पुलावरून येणा-या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते उंच उडून रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही कार विद्युत महामंडळाच्या खांबाला धडक दिल्याने विद्युत तारा तुटून मोठा स्फोट झाला. परीसरातील जिजाऊ नगर, गोलाईत, नगर सर्वेश्वर नगर येथील नागरीकांनी स्फोटाचा आवाज ऐकल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विद्युत तारा तुटल्याने या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत मंडळाचे कर्मचारी दुर्गादास उन्हाळे व कर्मचा-यांनी युद्धपातळीवर कार्य करून तुटलेल्या विद्युत तारा जोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. शहरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी दिव्यानंद गार्डन, के.के.एम कॉलेज अशी अनेक ठिकाणे असून या ठिकाणी फिरायला जाणे नागरीकांच्या दृष्टीने सुरक्षीत असल्याचे मत नागरीकातून व्यक्त होत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणीही नागरीकांनी केली आहे.