मानवत : इतिहास बघण्यासाठी आवश्यक असलेली दृष्टी तयार करण्याची क्षमता समदानी यांच्या पुस्तकात आहे असे प्रतिपादन डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
प्राचार्य डॉ. ओमप्रकाश समदानी यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांनी लिहिलेल्या मराठ्यांचा इतिहास नरहर कुरुंदकरांची भूमिका या पुस्तकाचे प्रकाशन दि.८ मार्च रोजी के. के.एम. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले. या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार होते. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे, सचिव बालकिशन चांडक, श्रीमती विजया समदानी, कैलास पब्लिकेशनचे के. एस. अतकरे, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लुलेकर म्हणाले, कुरुंदकर यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता इतिहासाचा अभ्यास केला. अतिशय परखडपणे इतिहासातील घटनांचे विवेचन केले. त्यामुळे कुरुंदकर यांची मराठ्यांच्या इतिहासाविषयी असणारी भूमिका सर्वांनी अभ्यासली पाहिजे. समदानी यांचे हे पुस्तक अतिशय संशोधनात्मक पद्धतीचे असून इतिहासाचा अभ्यास करणा-या प्रत्येकाने ते वाचले पाहिजे असे सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. गरुड, प्राचार्य डॉ. सिंगारे, सचिव चांडक, कत्रुवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.शारदा राऊत यांनी तर आभार प्रा. डॉ. सी. पी. व्यास यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील वकील, वैद्यकीय, व्यावसायिक, पत्रकार, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.