पाटोदा : पोलिस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी तू ये, असे म्हणून एका महिलेला बोलावले. नंतर तिला खोलीवर नेत मारहाण केली. त्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. ही घटना महिला दिनाच्या दिवशी पाटोदा शहरात घडली. याप्रकरणी पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.
एकीकडे महिलांचा सन्मान केला जात असताना दुस-या बाजूला सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसानेच अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव गडकर असे या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. तो मागील चार वर्षापासून पाटोदा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. महिला दिनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाटोदा पोलिस ठाण्यात एक महिला आली. तुमच्याच कर्मचा-याने माझ्यावर अत्याचार केला, अशी तक्रार तिची होती. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. तिच्या आरोपानुसार मागील १५ दिवसांपूर्वी गडकर आणि पीडितेची ओळख झाली होती.
शनिवारी सकाळी पीडिता ही पुण्याहून बीडला येत होती. यावर गडकर याने तिला महिला दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रम आहे, त्यामुळे तू पाटोद्यात उतर असे सांगितले. त्यानंतर तेथून ते दोघे एका बँकेजवळील खोलीवर गेले. तेथे कोणीच नसल्याने पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तिला कानाखाली मारली. तसेच ओरडली तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर पोलिस कर्मचारी गडकर निघून पोलिस ठाण्यात आला. त्यानंतर पीडिताही दुपारी दीड वाजेच्या सुमारास ठाण्यात आली आणि फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंद झाला. याचा तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करत आहेत.
अत्याचार करणा-या पोलिसाला तीन दिवस कोठडी
महिला दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन पाटोदा पोलिस ठाण्यातील उद्धव गडकर या हवालदाराने २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला, तसेच तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचीही धमकी दिली होती. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला होता. गडकर याला अटक करून रविवारी त्याला पाटोदा न्यायालयात हजर केले. यावेळी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पीडितेची पाटोदाऐवजी बीडला तपासणी
या प्रकरणातील पीडितेची शनिवारी रात्री बीड जिल्हा रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली; परंतु पाटोद्यात ग्रामीण रुग्णालय आणि सर्व वैद्यकीय तज्ज्ञ असतानाही बीडला का नेले? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत पाटोद्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिषेक जाधव म्हणाले, शनिवारी ग्रामीण रुग्णालयात पुरुष वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे कदाचित बीड येथे रेफर करण्यात आले असेल; पण बीड येथे पाटोदा ग्रामीण रुग्णालयातीलच वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी महिलेची तपासणी केली, असे सांगितले.