मुंबई : प्रतिनिधी
२००८ सालापासून कासवालाही लाजवेल अशा गतीने सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम हा चेष्टेचा विधी झाला आहे. हे काम पूर्ण करण्याबाबत आजवर अनेकांनी शब्द दिला, पण ते पूर्ण झाले नाही. आज विधानसभेत त्याची नवीन तारीख मिळाली. महामार्गाच्या कामाला विलंब झाला आहे. पण आता विविध टप्प्यांवरील कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. जानेवारी २०२६पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असेल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र्रराजे भोसले यांनी आज विधानसभेत दिले.
चिपळूण शहरातील शेखबहादूर चौकात उड्डाणपूलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना गर्डर व लाँचरसह उड्डाणपूलाचा काही भाग कोसळल्याच्या दुर्घटनेच्या संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव पुढे म्हणाले की, नशीब बलवत्तर म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम या दुर्घटनेतून बचावले या घटनेला सात महिने उलटले तरी अद्याप नव्याने काम सुरु झालेले नाही. या उड्डाणपूलाच्या बांधकामाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली होती. पण या समितीचा अहवाल गुलदस्त्यात राहिला.
या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाईचे आश्वासन देऊनही कारवाई झालेला नाही. एकूणच मुंबई गोवा महामार्गाच्या कामास झालेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे त्यांनी सांगितले. या महामार्गाचे काम रखडल्याने अपघांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात एका कुटुंबातील सर्वजणांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मात्र त्यात मुंबई-गोवा महामार्गाचा साधा उल्लेख केला नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा केली. मात्र ती हवेतच विरली. हा महामार्ग पूर्ण होण्या बाबत सरकार कडून प्रत्येक वेळी तारखा दिल्या आता २०२५ चे वर्ष उजाडले पण तरीही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
महामार्गाच्या कामाला विलंब झाल्याची कबुली देताना, जानेवारी २०२६ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले असेल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. कोकणातल्या गणपती आणि शिमगा सण लक्षात घेता सर्विस रोड सुस्थितित ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. चिपळूण उड्डाणपूल दुर्घटनेप्रकरणी ठेकेदाराला ५० लाख रुपयांचा आणि डिझाईन तयार करणा-या इंजिनियरला २० लाख रुपयांचा दंड दंड ठोठाल्याची माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर ते माणगाव बायपासच्या कामासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. निविदाही मागवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.