मुंबई : प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात त्यातील ३३ हजार कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. कालच्या अर्थसंकल्पातही फक्त ३६ हजार कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ ५० लाख बहिणींना या योजनेतून वगळले जाणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केला.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला, गुलाबी जॅकेट ही गेले. लाडक्या आजोबाना तीर्थक्षेत्राला घेऊन जाणार होतात, त्यांना अर्ध्यात सोडले अशी बोचरी टीका जाधव यांनी केली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना भास्कर जाधव यांनी सरकारवर बोचरी टीका केली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे आम्हाला एवढे बहुमत मिळाल्याचे महायुतीचे नेते मान्य करतात. पण सरकार आल्यापासून लाडक्या बहीणींची छाननी करून त्यांची नावे कमी केली जात आहेत.
आतापर्यंत ९ लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून अजूनही छाननी सुरूच आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा होईल, असे वाटत होते. वाढ तर मिळालीच नाही पण योजनेच्या तरतुदीमध्येही कपात झाली आहे. याचा अर्थ ५० लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होतील असे दिसत असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणले.
जाहीरनाम्यातील आश्वासने कुठे गेली ? : वडेट्टीवार
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर प्रखर टीका केली. महायुतीने निवडणुकीच्या वेळी अनेक घोषणा केल्या. त्याचे निर्णय पहिल्या कॅबिनेट मध्ये अपेक्षित होते नाहीतर पहिल्या बजेट मध्ये योजना आणल्या पाहिजे होत्या. पण महायुतीचे घोषणापत्र अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही अस अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते. पण महाराष्ट्र आता कर्जाच्या खाईत घालवल्याशिवाय महायुती सरकार थांबणार नाही असे चित्र आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महाविकास आघाडी सरकार असताना राज्यावर ५ लाख ७६ हजार कोटी कर्ज होते. तीन वर्षात कर्जात तब्बल ४५ टक्के कर्जात वाढ झाली.अजित दादा हीच तुमची आर्थिक शिस्त का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. अजित पवार म्हणतात शेतकरी कर्जमाफी बाबत मी बोललो नाही, पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरनामा वाचन करताना शेतकरी कर्जमाफी करू असे म्हणाले होते. त्यामुळे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, आता या जबाबदारी पासून सरकारने हात झटकू नये.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहिण, अन्नपूर्णा योजना, गुलाबी रिक्षा, तीर्थाटन योजना आनंदाचा शिधा ,कोरोना काळात आणलेली गरिबांना १० रुपयात जेवण असलेली शिवभोजन थाळी अशा योजना आणल्या होत्या. लाडकी बहिण योजनांमुळे महायुतीला भरभरून मते मिळाली. सरकार आले पण एकनाथ शिंदे यांच्याच योजना बंद करण्यात आल्या, म्हणजे योजना आणून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला कारण मुख्यमंत्री पद त्यांना मिळाले नाही असा टोला वडेट्टीवर यांनी लगावला.