मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होत असून, संख्याबळानुसार या पाचही जागा महायुतीला सहज मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी तिन्ही पक्षात प्रचंड चुरस सुरू आहे. यातील तीन जागा भाजपकडे असून त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते माधव भंडारी, मागच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्यासाठी मतदारसंघ सोडणारे दादाराव केंचे, अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात आलेले अमर राजुरकर यांची नावं आघाडीवर आहेत.
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी २७ तारखेला पोटनिवडणूक होत असून कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पाचही जागांची निवडणूक स्वतंत्र असल्याने स्पष्ट बहुमत असलेल्या महायुतीला फारशी अडचण नाही. या ५ पैकी ३ जागा भाजपाच्या, तर प्रत्येकी एक जागा शिंदेंच्या शिवसेनेची व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. भाजपाच्या तिघांना केवळ एक वर्षाची टर्म मिळणार आहे. त्यासाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तिघांच्या नावाची केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात आल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दिकी आणि आनंद परांजपे यांच्यासह डझनभर नावे चर्चेत आहेत.