बीड : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून पोलिस सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मागावर होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे,
राज्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेला सतीश भोसले ऊर्फ खोक्याला अटक झाली आहे. त्याने बीडमध्ये पिता-पुत्रांना अमानुषपणे मारहाण केली होती. याचा सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात आली. या सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.
बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेतले. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसले याच्यामुळे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर यावर आता भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सतीश भोसले ऊर्फ खोक्या हा मागील काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र पोलिसांनी सतत तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. अखेर महाराष्ट्र व उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. यावर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सुरेश धस हे भाजप आमदार आहेत. त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी, असे स्पष्ट मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्या हत्येची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मी डिसेंबर महिन्यामध्ये केली आहे. ११ डिसेंबरला यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सुरेश धस यांनी माझे नाव घेऊन कोणताही संबंध नसताना वैयक्तिक टीका केली. मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस आमच्यावर थेट आरोप करत आहेत. याबाबत देखील मी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. हे सुरेश धस यांनी करणं अपेक्षित नाही, त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये म्हणून मी मागच्या चार महिन्यांपासून गप्प बसले आहे. नागपूर अधिवेशनापासून आत्तापर्यंत मी गप्प बसले आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी अचानक मंत्री झाल्यानंतर बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे धस यांना का दिसू लागले आहे? माझा काही संबंध नसताना माझे नाव घेण्यात आले. धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते तर सुरेश धस हे आमदार आहेत. त्यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडबाबत का तक्रार केली नाही? असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.