ठाणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. ही गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला. यामुळे या विषयावर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मतभेद उफाळले आहेत.
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत न करण्याची मागणी केली. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी ही गावे नवी मुंबई महापालिकेतच राहणार आहेत. आपण गणेश नाईक यांची समजूत घालू अशी भूमिका घेतली आहे. महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेच्या वादात आता ठाकरे गटाने उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांवर १४ गावांना फुटबॉल बनवले जात आहे अशी टीका केली.
नाईक-शिंदे संघर्ष?
१४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये शीळ तळोजामधील १४ गावे नवी मुंबई पालिकेत नको असे स्पष्ट लिहिण्यात आले आहे. या कारणामुळे आता ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष डोके वर काढताना दिसत आहे.