लातूर : प्रतिनिधी
शहरातील अंबाजोगाई रोडवर मंगळवारी एकास नग्न करत भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या मारहाणप्रकरणातील जखमीच्या फिर्यादीवरून सात आरोपी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यातील सात पैकी चार आरोपींना मंगळवारी रात्रीच पोलीसांनी ताब्यात घेतले तर तीन आरोपी हे फरार झाले होते. ताब्यात घेतलेल्या चार पैकी तीन आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या हॉटेल राजश्री बारमध्ये ७ ते ८ जण जेवण करण्यासाठी बसले, दारू पिली. शेवटी बील देण्याचा प्रश्न आला तेंव्हा सहा ते सात जणांनी अजय बाबासाहेब चिंचोले रा. हारवाडी यास बील देण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार देताच अक्षय कांबळे, अजिंक्य मुळे, नितीन भालेराव, बालाजी जगताप, साहील शेख, प्रणव संदीकर व एक अल्पवयीन अशा सर्वांनी रोडवर अजयला आणून अक्षरश: कत्ती, चाकू, बाटलीने मारहाण केली. दरम्यान, या हाणामारीचे वृत्त पोलिसांना कळाले.
त्यांनी तात्काळ ७ पैकी चौघा जणांना ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा जखमी अजय चिंचोले याच्या फिर्यादीवरून सात जणांविरूद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, सार्वजनीक रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम आदी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या अजिंक्य मुळे, बालाजी जगताप व अक्षय कांबळे यांना न्यालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून या गुन्ह्यातील साहील शेख, प्रणव संदीकर व नितीन भालके हे तीन जण फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.