नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. मात्र, काँग्रेसने तेलंगणात सत्तांतर घडवून सत्ता काबिज केली आहे. तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार रेवंत रेड्डी यांना मानले जाते. त्यामुळे, तेलंगणाच्या प्रमुखपदाची जबाबादारीही त्यांनाचे देण्यात येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
रेवंत रेड्डी यांनी आज राजधानी दिल्लीत येऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो शेअर करत राहुल गांधींनी स्वत: ते तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसला चार राज्यात पराभवाचा सामना करावा लागला, पण तेलंगणात काँग्रेसने बीआरएसचा पराभवत करत सत्ता काबीज केली. या विजयात महत्वाची भूमिका बजवणा-या प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले आहे. शपथविधीची पूर्ण तयारी करण्यात आली असून गुरुवार ७ डिसेंबर रोजी रेड्डी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. इतर काही मंर्त्यांचाही शपथविधी होईल. तत्पूर्वी आज रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत जाऊन प्रमुख काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधींनी त्यांचे फोटो ट्विट करुन, तेलंगणात लवकरच काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी पूर्ण करण्यात येतील, असे म्हटले आहे.
हैदराबादमध्ये सीएलपीच्या बैठकीत रेवंत रेड्डींच्या नावे एकमत झाले, आता, स्वत: राहुल गांधी यांनीच रेवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, त्यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत रेवंत रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दिल्लीतील भेटीनंतर रेवंत रेड्डी यांचे काँग्रेस खासदार दिपेंद्र हुडा यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, संपूर्ण हरयाणाच्यावतीने मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, सोनिया गांधींसह, राहुल गांधी व प्रियंका गांधींनीही रेवंत रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे.
रेवंत रेड्डींना पक्षातून विरोध
रेवंत रेड्डी यांना पक्षातील काही नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, भट्टी विक्रमार्का, माजी मंत्री कोमातिरेड्डी व्यंकटा रेड्डी, माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा रेवंत रेड्डींना विरोध आहे. भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे आणि रेड्डींच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
तेलंगणात काँग्रेसची कामगिरी
तेलंगणात एकूण ११९ जागांपैकी ६४ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तसेच, बीआरएसने ३९, भाजपने ८ आणि एमआयएमने ७ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला ३९.४० टक्के, बीआरएसला ३७.३५ टक्के आणि भाजपला १३.९० टक्के मते मिळाली. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समितीचे पी नरेंद्र रेड्डी यांचा ३२००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.