अहिल्यानगर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील कचरू बाळू जगदाळे या शेतक-याने होळीसाठी गावरान गायींच्या शेणापासून जवळपास चार ते पाच हजार गोव-या बनवल्या असून, त्या विक्रीसाठी संगमनेर शहरात आणल्या आहेत. त्यामुळे या गोव-यांना जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. कचरू जगदाळे हे शेतकरी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील राहणार असून, त्यांच्याकडे जवळपास पाच ते सात गावरान गायी आहेत.
मागील वर्षीदेखील त्यांनी शेणापासून मोठ्या प्रमाणात गोव-या थापून त्या होळीनिमित्त शहरात विक्रीसाठी आणल्या होत्या, त्यातून त्यांना चांगले पैसेदेखील मिळाले होते. त्यामुळे याही वर्षी पुन्हा गोव-या विक्रीसाठी घेऊन जायचे त्यांनी ठरवले होते.
यानुसार जगदाळे यांच्यासह त्यांची पत्नी मीना यांनी जानेवारी महिन्यापासून गोव-या थापण्यास सुरुवात केली होती. दररोज त्या दोनशे ते तीनशे गोव-या थापत होत्या. उन्हात वाळवल्यामुळे गोव-या अतिशय कडक झाल्या होत्या. गुरुवारी (ता. १३) होळी असल्याने बुधवारी (१२) दुपारी जगदाळे यांनी सर्व गोव-या विक्रीसाठी शहरात आणल्या होत्या. १५ रुपयांना पाच गोव-या विकल्या. विशेष म्हणजे गावरान गायींच्या शेणापासून बनवलेल्या गोव-यांना जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे.