अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आरूढ झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प जणू काही डोंबा-याचा खेळ दाखवत आहेत. ते सत्तेवर आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, टॅरिफचा बागुलबुवा याचा थेट परिणाम शेअर बाजारावर होत आहे. मंगळवारचा दिवस जागतिक शेअर बाजारासाठी धक्कादायक होता. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार कोसळला. अमेरिकेतील एका टेलिव्हिजन शोमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. अमेरिकेची अर्थव्यवस्था संक्रमणातून जाण्याची शक्यता असून मंदीची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले. यंदा मंदीची शक्यता आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, अशा गोष्टींचा अंदाज वर्तवणे मला आवडत नाही परंतु आम्ही जे करत आहोत ते खूप मोठे आहे. त्यामुळे हा संक्रमणाचा काळ आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर गुंतवणूकदार चिंतीत झाले आणि त्याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले. मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार पहावयास मिळाले. भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप साधारणपणे ३९०.९१ लाख कोटी रुपयांवर घसरले. जे गत ट्रेडिंग सत्रात ३९३.८५ लाख कोटी रुपये होते.
म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे २.९४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या करामती थांबायला तयार नाहीत. त्याचे परिणाम नव्हे दुष्परिणाम जगभरातील गुंतवणूकदारांवर होत आहेत. जगभर मोठ्या आर्थिक मंदीची, प्रचंड बेरोजगारीची आणि व्यापार युद्धाची चर्चा सुरू आहे. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टसह अमेरिकेतील सर्व बड्या कंपन्या आणि जगभराचे शेअर मार्केट रोज नवे तळ गाठत आहे. टाटा, रिलायन्स, स्टेट बँक यासह भारतीय शेअर बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य प्रचंड घसरले आहे, रोज त्या घसरणीत भर पडते आहे. ही एकत्रित घसरण कितीतरी लाख कोटींची आहे. ट्रम्प दुस-यांदा अध्यक्ष व्हावेत म्हणून अमेरिकेतील भारतीयांनी आणि तेथे स्थिरावलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी ट्रम्प यांच्या विजयास मोठा हातभार लावला होता. परंतु सत्तारूढ झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपले खरे दात आणि विध्वंसक वृत्ती दाखवली. भारताबद्दलचे प्रेम, मोदी यांच्या बरोबरची मैत्री आणि त्यांना मारत असलेल्या मिठ्या किती नाटकी, बेगडी आणि फसव्या होत्या याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आणि उक्तीतून आला. २ एप्रिलला ते भारतातून अमेरिकेत येणा-या आयातीवर किती टॅरिफ लावायचा याची घोषणा करणार आहेत. ते काय घोषणा करणार याचा आता अंदाज आला आहे.
वास्तविक पाहता भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यावरील आयात व निर्यात शुल्क ठरवून त्याप्रमाणे आयात-निर्यात होत आली आहे. पण ट्रम्प यांनी भारत आयात शुल्क जास्त आकारतो आणि निर्यात शुल्क अत्यल्प देतो असे सांगत भारताला उघडे पाडू असे म्हटले आहे. एका अर्थाने त्यांनी असे वक्तव्य करून भारताचा अपमानच केला आहे. मोदी सरकारने यावर अजूनतरी निषेध नोंदवलेला नाही. परंतु भारत आता लेचापेचा राहिलेला नाही हे ट्रम्प यांनी लक्षात घ्यायला हवे. ट्रम्प यांनी भारताबरोबर व्यापार युद्ध सुरू केले तर भारत त्यांना भीक घालेल अशी आता स्थिती राहिलेली नाही. भारतीयांना आयात-निर्यातीसाठी जगाची बाजारपेठ खुली आहे. ब्रिक्ससारख्या व्यासपीठाचे नेतृत्व भारताकडे आहे आणि अमेरिकेतील अनेक उद्योगांचे प्रमुख भारतीय आहेत. ट्रम्प यांनी गंमत म्हणून एखादे विधान केले असे थोडा वेळ मानले तरी त्यातून त्यांची मानसिकता, साम्राज्यवादी वृत्तीच दिसून येते. जगातील एक मोठी शक्ती असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्राचे प्रमुख बाष्कळ विधान करतील असे म्हणता येत नाही पण त्यांनी केले हे वास्तव आहे.
ट्रम्प यांची बाष्कळ बडबड आणि निर्णयामुळे अमेरिका आणि तेथील शेअर बाजार, व्यापार, उद्योग अडचणीत आले आहेत. महागाई, बेरोजगारी, अडचणीत आलेली गुंतवणूक यामुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण आहे. जगभरातही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या आततायी स्वभावामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या आहेत. ट्रम्प यांनी अमेरिका रेसिप्रोकल टॅरिफ लावेल अशी घोषणा करून व्यापार युद्ध छेडले आहे. त्यामुळे जगभरात आयात-निर्यात होणा-या वस्तूंचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. खरेदीदार अशा वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतात. परिणामी वस्तूंची विक्री कमी होते आणि जागतिक मंदी निर्माण होते. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या असल्या तरी भारतीय बाजारावर आज तरी काही परिणाम दिसत नाहीत. मात्र, त्याचे अप्रत्यक्ष परिणाम पुढील काही महिन्यांत दिसून येऊ शकतात. म्हणून भारताने सुद्धा सावधगिरीची भूमिका घ्यावयास हवी. अमेरिका भारतावर आयात शुल्क लागू करणार आहे.
२ एप्रिलपासून अमेरिका भारतावर जेवढ्यास तेवढा कर आकारणार आहे. टॅरिफ हा दुस-या देशातून येणा-या मालावर लावलेला कर असतो. भारतातील कृषी आणि अन्नधान्य निर्यातीवर टॅक्सचा सर्वाधिक परिणाम होईल. टॅरिफ लावला गेल्याने अमेरिकेतून भारतात येणा-या वस्तूंची किंमत दुप्पट होईल. तसे झाल्यास भारतात त्या वस्तूंची खरेदी केली जाणार नाही. याचा मोठा परिणाम खरेदी-विक्रीवर होईल. त्यामुळे जगभरात आर्थिक मंदीचे सावट अधिक तीव्र होईल. ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतावर आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. चीनने त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सध्यातरी जगभरात आर्थिक मंदीचे सावट तीव्र झाले आहे. ट्रम्प यांच्या कोलांटउड्या आणखी कोणता खेळ दाखवतात ते बघायचे!