ठाणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. दरम्यान, होळीच्या निमित्ताने ठाण्यात या प्रमुख आरोपींना प्रतिकात्मक फाशी देत होळी दहन करण्यात आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यांना फाशी देण्याची मागणी होत असतानाच ठाण्यातील चंदनवाडी परिसरात आरोपींची होळी तयार करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचे फाशी देतानाच प्रतिकात्मक फोटो होळीवर लावण्यात आले होते. होळी जाळून या क्रूर हत्येचा निषेध करण्यात आला. या होळीच्या संकल्पनेबद्दल उपस्थितांनी सांगितले की, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या या आरोपींच्या प्रतिमा होळीत जाळणार आहोत. आपल्या देशात बलात्कार असो किंवा खुनी, त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा नाही. पण, देशाचे संविधानावर विश्वास आहे.
या आरोपींना पुढच्या होळीच्या आधी फासावर लटकवले जावे, अशी आमची मागणी आहे. त्यामुळेच आम्ही हे होळी दहन करत आहोत. या हत्येचा निषेध करण्यासाठी अशा पद्धतीने होळीचे दहन करत आहोत, असे या होळी दहन करणा-या उपस्थितांनी सांगितले.
कृष्णा आंधळे अजूनही फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. कृष्णा आंधळे यानेच संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर व्हीडीओ कॉल केले होते. संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा परिसरात फेकल्यापासूनच तो फरार आहे. त्याची हत्या झाली असल्याचे दावे आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. तर कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी त्याची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केलेला आहे. इतका शोध घेऊनही तो सापडत नाहीये, याचा अर्थ तो जिवंत नाहीये, अशी मला शंका येत आहे, असेही शिरसाट म्हणालेले आहेत.
दरम्यान, १२ मार्च रोजी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचे दावा केला गेला. मात्र, पोलिसांनी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे नंतर स्पष्ट केले.