लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयद्वारा आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२४ ची प्राथमिक फेरीत लातूर केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. ६ डिसेेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता देशभक्त राजगुरु बहुउद्देशिय सांस्कृतिक युवक, क्रीडा मंडळ लातूरच्या वतीने डॉ. अनिलकुमार साळवे लिखीत व दीपरत्न निलंगेकर दिग्दर्शित ‘सूरज के बुलंद हौसले’ हे दोन अंकी नाटक सादर झाले. या नाटकाच्या उत्कृष्ट सादरीकणाला नाट्यरसिकांची उत्स्फुर्त साथ मिळाली.
सीमेवर लढणा-या सैनिकांच्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्थितीवर या नाटकातून प्रभावी भाष्य केले आहे. शहीद झालेल्या सैनिकांच्या हौतात्म्याचे समाजातील अनेक घटक भांडवल करतात पण त्या कुटुंबाला भक्कम आधार देण्याचा विचार मात्र सोयीस्करपणे विसरतात. सद्य परिस्थितीवर हे नाटक भाष्य करते. बरं बोलावे की खरं बोलावे. कारण बरं सर्वांनाच आवडतं पण खरं खरं असूनही ते सहजपणे स्वीकारले जात नाही. नेमके याच मर्मावर या नाटकाने बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
नाटकाची तिसरी घंटा, पडदा उघडतो आणि द-याखो-यात भारतीय सैन्य जीवाची पर्वा न करता दुश्मनाशी दोन हात करीत असतात. लढता लढता दोन सैनिक शहीद होतात. हा प्रसंग देशभक्तीचा सर्वोच्च बिंद गाठणारा ठरतो आणि नाटकाला सुरुवात होते. अनिरुद्ध जंगापल्ले यांनी म्हातारा ही व्यक्त्तीरेखा साकारली. जुन्यापिढीतील देशभक्त असलेला हा म्हातारा जनरल डायरशी भीडल्याचा प्रसंग सांगतो. आपले सैनिक दिवसरात्र सीमेवर चीनच्या कुरापतींचा हिमतीने सामना करीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असताना देशातील नागरीक मात्र चीनच्या वस्तूंचा मनमुराद आनंद घेतात त्यांना राजकारण्यांचीही साथ असते.
हे वास्तव उलगडून सांगत असताना सैन्यात असलेल्या रत्नदीपला (रणजीत आचार्य ) अनावर होणारा राग एक सैनिकाच्या मनातील खदखद व्यक्त करणारा होता. अंजली कांदे (शोभा), सुवर्णा बुरांडे (नंदा), चारुशीला भोसले (अक्का), अलोेक शेळके (गोटू), भीम दुनगावे (सोना काका), असलम शेख (बाप्पा), श्रीकांत (आकाश सोनकांबळे), सुरेंद्र (चंद्रप्रकाश वाघमारे) यांनी आपापल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारुन नाटकाला एक उंचीवर नेले. मोहिनी निलंगेकर यांची निर्मिती असलेल्या सूरज के बुलंद हौसले या नाटकाची प्रकाश योजना रमन राजहंस यांची होती. नाईट उफेक्टचा त्यांनी छान वापर केला. प्रकाश गंगणे यांची वेशभूषा बरी होती. सिद्धार्थ लांडगे यांचे संगीत संयोजन उत्तम होते. भारत थोरात यांनी नेपथ्य आणि रंगभूषेत नेहमीसारखीच कसब दाखवली. शेवटच्या क्षणापर्यंत नाटकाने नाट्यरसिकांना खिळवून ठेवले होते.