मुंबई : प्रतिनिधी
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यानंतर काही दिवसातच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आता करुणा शर्मा यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांना आता आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. यावर करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. आज या तक्रारीवर सुनावणी होती. या सुनावणी आधी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आता आमदारकी जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
निवडणुकीवेळी सगळ्यांनी २०० बूथ कॅप्चर केल्याचं बघितलं. तसे निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. २०१४ पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर कोणत्याच अधिका-यांनी ऑब्जक्शन घेतले नाही. २०२४ मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले. या सर्वावर माझी लढाई सुरू आहे. आता त्यांचे वॉरंट निघेल, त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल, असा दावा करुणा शर्मा यांनी केला. जसे मी आधी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाणार असं बोलले होते, तसं आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला.
कृषी मंत्री काकाटेंवर टीका
यावेळी करुणा शर्मा यांनी माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत कोर्टाने दिलेल्या निकालावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, लोकांच्या पैशाचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणे, हे आहे. पण, भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार? त्यामुळे हे गेले पाहिजे, मी याचिका दाखल करणार आहे, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.