बगदाद : इराकी सैन्याने लष्करी कारवाईत आयसिसचा सीरिया प्रमुख अबू खदीजा याला ठार मारले. इराकी पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी शुक्रवारी याची पुष्टी केली. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीनेही सहकार्य केले.
पंतप्रधान सुदानी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अबू खादीजा हा इराक आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक होता. एकेकाळी इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागांवर नियंत्रण ठेवणारा आयसिस आता पुन्हा संघटित होण्याचा प्रयत्न करत आहे.
२०१४ मध्ये, अबू बकर अल-बगदादीने इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागात खलिफाट घोषित केले, परंतु २०१९ मध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईत तो मारला गेला. यानंतर संघटनेचा -हास सुरू झाला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, २०२४ च्या पहिल्या सहामाहीत इराक आणि सीरियामध्ये आयसिसने १५३ हल्ले केले. हा आकडा गेल्या वर्षीच्या दुप्पट असू शकतो, ज्यामुळे दहशतवादी संघटना पुन्हा मजबूत होण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका
बगदादीच्या मृत्यूनंतर इसिसचे नेतृत्व अस्थिर राहिले आहे, कारण त्याचे उत्तराधिकारी फार काळ टिकू शकलेले नाहीत. असे असूनही, मध्य पूर्व, पश्चिम आणि आशियातील तिच्या शाखा आणि युतींमुळे ही संघटना एक मोठा धोका आहे.
इराकी लष्कराचे ऑपरेशन सुरूच राहणार
इराकी सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील उर्वरित आयसिस दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम सुरूच राहील आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल.