हैदराबाद : स्वत: पत्रकार असल्याचा दावा करत लोकप्रतिनिधींबाबत आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणा-या व्यक्तींना तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सक्त ताकिद दिली आहे. अशा व्यक्तींचे कपडे उतरवून त्यांची धिंड काढली जाईल. त्यानंतर त्यांची धुलाई केली जाईल, असा इशारा रेवंत रेड्डी यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांबाबत कथितपणे अपमानास्पद माहिती प्रसारित केल्याप्रकरणी दोन महिला पत्रकारांना करण्यात आलेल्या अटकेचा उल्लेख करताना विधानसभेमध्ये रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली आणि त्यांनी धमकी दिली.
रेवंत रेड्डी म्हणाले की, आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये टीकेला सामोरं जायला तयार आहोत. मात्र आमच्या कुटुंबातील सदस्यांना का लक्ष्य केले जात आहे? जोपर्यंत पत्रकारितेच्या आडून अपमानास्पद माहिती पसरवण्याच्या विषारी संस्कृतीला सोशल मीडियावर विस्तारण्यास वाव मिळत राहील, तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशारा रेवंत रेड्डी यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असल्याने शांत आहे, या भ्रमात राहू नका. मी तुम्हाला पूर्ण विवस्त्र करेन आणि तुमची धुलाईसुद्धा करेन. माझ्या एका इशा-यावर लाखो लोक तुम्हाला मारण्यासाठी रस्त्यावर उतरतील. केवळ संविधानाबाबत माझ्या मनात सन्मान आहे, म्हणून मी शांत आहे. याला माझा कमकुवतपणा समजू नका. मी जे काही करेन ते पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहुन करेन.
रेवंत रेड्डी पुढे म्हणाले की, मी पत्रकारांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे. तसेच गरज पडली तर मी अशा प्रकारच्या आक्षेपार्ह बातम्यांच्या फैलावास अटकाव करण्यासाठी कायदाही करेन. याबरोबरच रेवंत रेड्डी यांनी माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवाल रेड्डी यांना मान्यताप्राप्त पत्रकारांची यादी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबरोबरच रेवंत रेड्डी यांनी पत्रकार संघटनांना पत्रकारांची यादी देण्याचे आदेशही दिले आहेत. ज्या व्यक्तींचा या यादीमध्ये समावेश नसेल, त्यांना पत्रकार मानलं जाणार नाही. आम्ही त्यांना गुन्हेगार मानू. तसेच जसं वर्तन गुन्हेगारांसोबत केलं जातं, तशीच वागणूक आम्ही त्यांना देऊ. त्यांना विवस्त्र करून त्यांची धुलाई केली जाईल. तसेच ही शिक्षा कायद्याच्या चौकटीत राहून दिली जाईल, असा इशारा रेवंत रेड्डी यांनी दिला.