सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला. १० मार्चपासून शाळा सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरत आहेत. मात्र, पाच दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.
या काळातील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आता शाळा सुटण्याची वेळ कमी करण्याची तयारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दर्शविली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार शाळा सुटण्याची वेळ पावणेबारा किंवा बारा अशी होईल.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली, त्यात शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप म्हणाले, आमच्या विभागाकडील शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी बारापर्यंत आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत आहे. त्यामागे विद्यार्थ्यांना अधिकाधिक अध्यापन व्हावे हा हेतू आहे, पण जिल्ह्यात दोन हजार ७७७ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एक लाख ९८ हजारांवर विद्यार्थी आहेत. त्यातील बरेच विद्यार्थी वाड्या-वस्त्यांवरून गावातील शाळेत येतात.
दुपारी साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर त्यांना घरी जायला किमान १५ मिनिटे तरी लागतात. अनेक विद्यार्थी कौटुंबिक परिस्थितीमुळे अनवणी येतात. त्यामुळे शाळा सुटण्याची वेळ नेमकी उन्हाचा पारा वाढलेला असतो तेव्हाचीच आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा सुटण्याची वेळ कमी करावी, अशी मागणी पालकांसह शाळा व्यवस्थापन समित्यांची देखील आहे. त्यावर दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
मानवाच्या शरीराचे सरासरी तापमान ३८ अंशापर्यंत असते. प्रत्येक व्यक्तीचे ते प्रमाण वेगवेगळे असते. शरीरापेक्षा बाहेरी तापमान वाढल्यावर डी-हायड्रेशन होऊन (पाणी कमी होते) चक्कर येते, मळमळ होते. त्याचे प्रमाण जास्त झाले आणि संबंधितास वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे वाढत्या तापमानात घराबाहेर पडणे टाळावे.असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगीतले.