मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पाचही जागांसाठी महायुतीने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने रविवारी सकाळीच तीन उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने सोमवारी सकाळी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करुन अनेक इच्छूकांची दांडी उडवली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) संजय खोडके यांना उमेदवारी घोषित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी आणि दीपक मानकर उत्सूक होते. मात्र अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे संजय खोडके यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकही उमेदवार जाहीर केलेला नाही, त्यामुळे महायुतीच्या पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. या सभागृहातील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. यातील तीन जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
भारतीय जनता पक्षाने संभाजीनगर जिल्ह्यातील संजय केनेकर, वर्धा येथील दादाराव केचे आणि नागपूर येथील संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रविवारी तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर सोमवारी सकाळी शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभे पराभूत झालेले झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पक्षातील वरिष्ठांचा पाठिंबा असताना पक्षातून विरोध होत असल्याचे कारण देत त्यांच्या नावावर फुली मारली गेली. उमेश पाटील यांचे नाव देखील आघाडीवर होते. मात्र अखेरच्या क्षणी विदर्भातील अमरावती येथील अजित पवार यांचे निकटवर्तीय संजय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या पाच आमदारांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक
भाजपचे आमदार प्रवीण दटके, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रमेश कराड तसेच, शिवसेना (एकनाथ शिंदे) आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आमदार राजेश विटेकर या पाच आमदारांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. हे पाचही आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पाच रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे.