सोलापूर : माहेरच्या मंडळींसमक्ष विवाहितेचा गळा दाबत जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पती शुभम डोमकलवार, सासू जयश्री डोमकलवार, नणंद स्नेहा उर्फ सोनी रेवंतवार, नेहा उर्फ मोनी कोटलवार (सर्व रा. गणेश कुलर फॅक्टरीमागे, चांदापूर रोड, परळी वैजनाथ, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील फिर्यादी ईश्वरी शुभम डोमकलवार (वय २७, रा. शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) हिने १२ सप्टेंबर २०२३ रोजी सासरच्या मंडळींविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्यावर ते पोलिस ठाण्यात हजर झाले नाहीत. त्यानंतर तो अर्ज महिला सुरक्षा विभागाकडे वर्ग केला होता.
तेथेही समुपदेशनासाठी ती मंडळी आली नाहीत. त्यामुळे १९ नोव्हेंबर रोजी ईश्वरी हिचे आई वडील व मामा सुधीर हे तिला सोडण्यासाठी सासरी गेले होते. प्रकरण मिटवून गुण्यागोविंदाने संसार व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पण तेव्हा संशयितांनी तू आताच्या आता निघून जा, तू इथे राहिली तर जीव मारुन टाकू, अशी धमकी दिली. तसेच गळा दाबताना तिच्या आई वडील व मामाने सोडविले. याप्रकरणी ईश्वरी हिने परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वारंवार तक्रार देऊनही सासरच्या मंडळींच्या वर्तनात बदल झाला नाही. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने तपास करीत आहेत.