मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणा-या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढल्या आहेत. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय देताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची विनंती मान्य केली आहे. प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी १७ मार्च रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल १८ मार्चपर्यंत राखून ठेवला होता. आता हा निकाल समोर आला असून न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता.
हा फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे. सोबतच यावेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचाही आरोप आहे. याच प्रकरणात कोरटकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कोरटकरने अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मात्र हा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता कोरटकर याला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
कोरटकरच्या अंतरिम जामिनावर १७ मार्च रोजी युक्तिवाद झाला होता. यावेळी इंद्रजित सावंत यांची बाजू वकील असीम सरोदे यांनी मांडली होती. सरकारी वकील विवेक शुक्ल यांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला होता. स्वातंर्त्य म्हणजे स्वैराचार नाही. गुन्हा दाखल होताच कोरकटर तो माझा आवाज नाही म्हणत फरार झाला, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तर आरोपी प्रशांत कोरटकर याची बाजू वकील सौरभ घाग यांनी मांडली.